दीपक नागरे “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारिता” राज्य पुरस्काराने सन्मानित..

Share news

सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल ह्या राष्ट्रव्यापी पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना दिला जाणारा “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारिता राज्य पुरस्कार” जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार दीपक सत्यभान नागरे यांना प्रदान करण्यात आला आहे.

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल ह्या राष्ट्रव्यापी पत्रकार धाराशिव येथील व्यंकटेश महाविद्यालयातील स्व. प्रमोद महाजन सभागृहात दि. २४ व २५ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. त्या मध्ये सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथील पत्रकार दीपक नागरे यांना सपत्नीक “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारिता राज्य पुरस्काराने” गौरविण्यात आले.

या राज्यस्तरीय पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कमलाकर बापू कुलकर्णी, तर प्रमुख उस्थितीत संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गोविंद सिंग राजपूत, जिल्हाध्यक्ष विकास सोनवणे, सरचिटणीस सुधीर पवार, उपाध्यक्ष अच्युत पुरी, निसार पटेल, माधव सिंग राजपूत, विष्णू उघडे, अशोक कुलकर्णी, प्रा. डॉ. कृष्णा तेरकर, ज्येष्ठ पत्रकार शीला उंबरे, कुलदीपसिंग परदेशी, केंद्रीय संघटनेचे उपाध्यक्ष गणेश गोडसे, उमरदराज पठाण, झुल्फिकार अली, भगवान नागरे यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

पेशाने सेवानिवृत्त शिक्षक असलेले दीपक सत्यभान नागरे हे गेल्या तीस वर्षांपासून देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. २०१९ मध्ये त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी सिंधुदुर्ग येथे “महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने” तसेच कराड, जि. सातारा येथे पत्रकारिता क्षेत्रातील “प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्काराने” गौरविण्यात आले आहे. ह्या पुरस्काराने सिंदखेडराजा मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारितेच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा रोवला आहे.