सिंदखेडराजा सुरेश हुसे
पोलिस म्हटले की भांडण तंटे, चोरी, हल्ला आदि गुन्हे झाल्यावर पोलिस घटनास्थळी उशीरा येतात हा सर्व सामान्यांचा गैरसमज किनगावराजाचे ठाणेदार वाघमारे यांनी आपल्या सतर्कतेने व समयसुचकतेतून दूर केला आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील किनगांव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत दुसरबीड येथे मित्राने मित्राच्या डोक्यात दारूच्या नशेत दगड टाकून घटनास्थळावरून पोबारा केला. मात्र बाजूच्याच मैदानावर क्रिकेट सामने सुरु होते. त्या खेळाच्या सामन्यातील बॉल हा घटनास्थळाकडे गेला होता. काही खेळाडू हे बॉलच्या शोधात गेले असता, तेथे एक युवक रक्तबंबाळ व अर्धमेल्या अवस्थेत आढळून आला. हा प्रकार बघून, त्या घाबरलेल्या खेळाडूंनी तात्काळ बघितलेल्या दृश्याची माहिती ठाणेदारांना दिली. कॉल स्वीकारल्या बरोबर ठाणेदारांनी वेळ न दवडता प्रथम रुग्णवाहिकेला कॉल केला. ठाणेदार व पाठोपाठ रुग्णवाहिका अवघ्या दोन मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेतील युवकाला तात्काळ उपचारासाठी जालना येथील सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले.
किनगांवराजा पोलिस स्टेशन चे ठाणेदार दत्तात्रय वाघमारे हे पत्रकार संघटनेचा कार्यक्रम आटपून सोनोषी येथे सरंपच निवडणूक असल्याने तेथे चालले होते. मार्गावर असतांनाच त्यांना ह्या घटनेची माहिती मिळाली. विनाविलंब घटनास्थळी पोहोचून प्रथम जखमी युवक राउफखान शब्बीरखान ह्यास उपचारासाठी रूग्णालयात भरती करण्यात आले. तात्काळ चक्रे फिरवीत आरोपी पकडण्यासाठी तयारी करीत अवघ्या वीस मिनीटाच्या आत आरोपीला दुसरबीड येथील नाका परिसरात अटक केली.
जखमी युवकाला वेळीच उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले. तर आरोपीला सुद्धा अटक करण्यात यश आले. सद् रक्षणाय, खल निग्रहणाय या पोलीसांच्या ब्रीदवाक्याची जबाबदारी निभविण्यासाठी आपण कटीबध्द आहोत हे, ठाणेदार वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिध्द केले. मित्राकडून युवकावर प्राणघातक हल्ला प्रकरणी वाघमारे यांनी वेळ न दवडता, सदसद्विवेकबुद्धीचा वापर करीत निर्णय घेतल्याने, गंभीर जखमी युवकाचा जीव वाचला, नव्हेतर आरोपी सुद्धा पकडल्या गेला.
ह्या सर्व घटनाक्रमातून ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, एवढे मात्र खरे ..!