( प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार )
कात्रज हडपसर व कात्रज फुरसुंगी रस्त्याना जोडणारा एक चौक म्हणजेच उंड्री चौक. हा चौक सतत गजबजलेला असतो. या चौकात वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. पादचारी, दुचाकी चारचाकी, रिक्षा यांची सतत वर्दळ असते. उंड्री चौक अतिक्रमणाने घेरला गेलेला आहे. येथेच बस रिक्षा थांबा आहे. बसस्टॉप नावालाच आहे. चार पाच प्रवाशी प्रतीक्षा करतील एवढीच जागा उपलब्ध आहे. तेथेच किरकोळ विक्रेते आहेत. खाध्य पदार्थ विक्री गाडे, भाजीपाला विक्रेते, चहा पान टपऱ्या येथे असल्याने वाहन चालक रस्त्यातच वाहने उभी करून थांबलेले असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. परिसर तसा अस्वच्छ आहे. वाहतुकीवर कोणाचेच नियंत्रण नाही. एखादा दुसरा वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस असतो. वाहतुकीची कोंडी सोडवण्या पेक्षा वाहने थांबवून कारवाई करण्याकडे त्याचा कल असतो. चौकात सिग्नल यंत्रणा आहे. ती बंद स्थितीत आहे. खरं तर हा चौक सुशोभीत केला पाहिजे. पीक अप शेड मोठे हवे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये असा नियम असला तरी रस्त्यावरच काहीजण धूम्रपान करताना दिसतात. चौकाला शिस्त लावण्याची गरज आहे. अवजड वाहनासाठी पर्यायी मार्ग काढण्याचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून दुर्लक्षित आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास वाहतूक कोंडी दूर होऊ शकेल.