अक्षता म्हात्रे कुटुंबियांचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले सांत्वन ; जलदगती न्यायालयात खटला दाखल करून फाशीची शिक्षेची मागणी ..

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि.२६, कोपरखैरणे (ठाणे ) : अक्षता म्हात्रे सामूहिक अत्याचार आणि हत्ये प्रकरणातील पीडित महिलेच्या कोपरखैरणे येथील निवासस्थानी रमाकांत आगास्कर कुटुंबियांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी २५ जुलै रोजी सकाळी सांत्वनपर भेट घेतली.त्यांनी अत्याचार आणि हत्याकांड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघां आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

अक्षता म्हात्रेची खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी पोलीस नवी मुंबई पोलीस आणि शिळ डायघर पोलिसांनी आवश्यक ते पुरावे गोळा केले आहेत. यासाठी राज्य महिला आयोगाकडून न्यायालयाला पत्र पाठविण्यात येणार असून आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील रुपाली चाकणकर यांनी यावेळी केली. यावेळी रुपाली चाकणकर यांनी काही महिला विविध प्रकारच्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवितात, ही टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सखी वन स्टॉप सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटर मध्ये न्यायग्रस्त पीडित महिलेस वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत केंद्र, समुपदेशन केंद्र व कायदेशीर मदत तातडीने एका छताखाली उपलब्ध होते. हे केंद्र २४ तास सेवा पुरवण्यासाठी उपलब्ध असून केंद्रामध्ये महिलांना त्यांच्या मुलांसमवेत प्रवेश देण्याची सोय आहे. अशीही माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.

पिडीत महिलेला शारीरिक,मानसिक असा छळ केल्याने तिला टोकाची भूमिका घेत घर सोडून जावे लागल्याने तिच्या मृत्यूस सासरची मंडळीही तितकीच कारणीभूत असल्यामुळे त्यांच्यावरही गंभीर गुन्हा दाखल व्हावा. आणि त्यांनाही जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी पिडीत कुटुंबीयांनी केली. पिडीत महिलेचा नवरा कुणाल म्हात्रे,सासू मंदा म्हात्रे आणि यांना अटक केली असून नणंद दीपमाला कडू हिचा पोलीस शोध घेत आहेत.

अत्याचार आणि हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून या प्रकरणाच्या पहिल्या दिवसांपासून पाठपुरावा सुरु केला आहे. त्यासाठी पोलिसांनी लवकरात लवकर चार्जशीट तयार करून सर्व पुरावे गोळा करून कोर्टात द्यावे. अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. यावेळी राष्टवादी कॉग्रेस (अजितदादा ) गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, सहायक पोलीस आयुक्त योगेश गावडे, शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे तसेच कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह कोपरखैरणे ग्रामस्थ उपस्थित होते.