कोण आहे हे केवट-तागवाले ? जाणून घ्या संपूर्ण माहिती..

Share news

सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी :- ज्ञानेश्वर तिकटे (केवट)

[ केवट – तागवाले या समाजाचा परंपरागत व्यवसाय कालबाह्य झाला आहे. तरुण पिढी नवीन शोधात आहे. किशोरवयीन मुले-मुली शिक्षणाची कास धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने भटके विमुक्त ‘ब’ वर्गात केवट-लागवले या जमातीचा समावेश केल्यामुळे आता या समाजाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबद्दल केवट-तागवाले समाजाने व केवट समाज महासंघाने आभार व्यक्त केले आहे.]

– ऑगस्ट २०२४च्या प्रथम सप्ताहात महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत भटके विमुक्त समाजासंबंधी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये केवट तागवाले, तागवाली, तागवाला जमातींचा भटके विमुक्तच्या ‘ब’ वर्गात समावेश केला गेला, तर ठेलारी या जातीचा भटक्या विमुक्तमधील ‘सी’ या वर्गातील धनगर जातीची उपजात म्हणून समावेश करण्यात आला. त्यानंतर सगळीकडे या दोन जातींबाबत चर्चा सुरू झाली. सगळ्यांचा प्रश्न होता कोण आहेत हे केवट तागवाले?

पंचमहाभूतांमधील एक तत्त्व ‘जल’ जलावर अधिराज्य गाजवणारा भोई समाज, या भोई जातीच्या उपजातींमध्ये केवट, ढीवर, नावाडी, कहार, मल्हार इत्यादी जातींचा समावेश होतो, केवट या शब्दाचा अर्थ होडी (नाव) चालविणारा, असा होतो. केवट यामधील एक उपजात म्हणजे केवट-तागवाले. महाराष्ट्र शासनाने भटके विमुक्तमधील ‘ब’ वर्गात या जातीचा समावेश केला. काही राज्यांत अनुसूचित जातीमध्ये केवट, भोई समाजाचा समावेश होतो, तर काही राज्यात अनुसूचित जमातीमध्ये समावेश होतो. उत्तर भारतात नाविक, तर आसाममध्ये केवटो, पश्चिम बंगालमध्ये केओट या नावाने या जाती परिचित आहे. महाराष्ट्रामध्ये भटके विमुक्त या वर्गात या जातींचा समावेश केला आहे.

केवट, भोई या समाजाचे फार प्राचीन संदर्भ सापडतात. रामायणकाळात प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मण यांना वनवासानंतर आपल्या होडीमध्ये (नावेमध्ये) बसवून गंगा नदी पार केली होती, त्या निषादराजाचे वर्णन रामायणामधील अयोध्याकांडामध्ये येते. निषादराज गृह हे नावाडी समुदायाचे राजे होते. शृंगवेरपूर त्यांचे राज्य होते. प्रभू रामचंद्र व निषादराज यांची भेट झाली होती. भगवान रामांनी निषादराजाला आपल्या होडीमधून गंगा पार करून देण्याची विनंती केली. परंतु निषादराज यांनी एक अट घातली व त्याप्रमाणे प्रभूचे पाय धुऊन त्यांना होडीमध्ये बसविले. या प्रसंगी प्रभू रामचंद्रांनी एक अंगठी घेण्याची विनंती केली, परंतु निषादराजांनी ती अंगठी घेतली नाही, याचा अयोध्याकांडामध्ये उल्लेख येतो-

मी बोट फक्त तुझ्यासाठी यायला सांगितले, मी तुला माझ्या हृदयात जायला सांगितले! कमळाचे पाय कुठे आहेत, काय म्हणायचे आहे, मानवी जीवनात काय करायचे आहे!

‘जिथे पाणी, तिथे केवट’ या नैसर्गिक स्वभावामुळे केवट समाज नदीकाठी वस्ती करून राहत आला आहे. नदीच्या आधारावर मासेमारी, होडी चालविण्याचा व्यवसाय, नदीमधून ताग काढणे, पुढे नदीमध्ये ताग लावणे इत्यादी व्यवसाय करू लागले. झोपडी, कुड, पाल बनविण्यासाठी प्रथमतः या तागाचा उपयोग होत होता. पुढे या तागापासून दोरी, दौरखंड बनविण्याचा व्यवसाय सुरू झाला. कालांतराने पोळा सणाला बैलाचे साज बनविण्याचासुद्धा व्यवसाय सुरू केला, ती ही जमात म्हणजे केवट तागवाले, तागवाली,

तागवाला. महाराष्ट्रात या जमातीची लोकसंख्या फार अल्प असून, जळगाव, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये हा समाज आढळतो. बुलढाणा जिल्ह्यामधील राहेरी या गावात बहुतांश हाच समाज आहे. त्याचप्रमाणे सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड, लिमगाव, वाघरी आणि जालना जिल्ह्यामधील खडकपूर्णा, ब्रह्मपुरी, कुंभारझरी या गावांत केवट तागवाले हा समाज वसलेला आहे.

[ प्रथा आणि परंपरा ]

केवट तागवाले समाज हिंदी, मराठी भाषा बोलत असला, तरी आपसात बोलताना ते ‘केवट’ या बोलीभाषेचा उपयोग करतात. केवट तागवाले जमातीचे वैशिष्ट्य म्हणजे या जमातीमधील महिला मराठी महिलांप्रमाणे साडीचा पदर घेत नाहीत, तर त्यांची पद्धत उलट प्रकारे पदर घेण्याची आहे. या जमातीवर प्रभू रामचंद्र यांचा फार प्रभाव आहे, म्हणून सर्वत्र रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्याचबरोबर ही जमात श्री मुंबादेवी, म्हसोबा, शीतलामाता, रेणुकादेवी, कामाक्षादेवी, कळमजामाता या देवदेवतांची पूजा करते.

आषाढ महिन्यात गावागावात श्री मुंबादेवीचा उत्सव साजरा केला जातो. प्रसंगी नवस फेडण्यासाठी बोकड बळी देण्याची पद्धत आहे. केवट-तागवाले समाजात महिन्यामधील ‘भुजरिया’ या उत्सवाचे विशेष महत्त्व आहे. हा उत्सव फक्त महिलांचा असून श्रावण महिन्याच्या सुरुवातीला बांबूपासून बनविलेल्या टोपलीमध्ये गहू उगविले जातात. त्या भुजरियासमोर पारंपरिक गीत गातात, याला या जमातीमध्ये ‘जस’ म्हणतात. संपूर्ण गीते रामायणावर आधारित असतात. हा उत्सव महिलांचा असून विसर्जन करताना पारंपरिक गीत व नृत्य केले जाते व आनंद व्यक्त करतात. या नृत्यप्रकाराला या जमातीमध्ये ‘गोरह्या’ असे म्हणतात

केवट तागवाले या समाजात ‘सावन उत्सव’ सुद्धा साजरा होतो. प्रसंगी पुरुष दंडा-सोहळा खेळतात, सोंग घेऊन आनंदात उत्सव साजरा करतात. या खेळात एक मोठे रिंगण तयार करून पुरुषमंडळी दंड (टिपऱ्याप्रमाणे) घेऊन रिंगणावर उभे असतात व मधोमध वाद्य वाजविणारे असतात. ज्या प्रकारे वाजविण्याची गती वाढेल, त्या प्रमाणात खेळ खेळण्याची गती वाढते. खूप वेळा हा खेळ खेळताना दुखापतसुद्धा होत असते. त्यामुळे हा खेळ केवळ पुरुष मंडळीच खेळतात.

[ लग्नसोहळा ]

केवट-तागवाले या जमातीमधील लग्नसोहळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा सोहळा सात दिवसाचा असतो. या जमातीमध्ये हंडा पद्धत नाही, तर वरपक्षाने वधुपक्षाला आर्थिक सहयोग करावा लागतो. याला ‘नेग’ असे म्हणतात. या जमातीमध्ये हळदीचा मंडप हिरवा असतो म्हणजे तो जांभळाच्या फांद्यापासून तयार केला जातो. या लग्नसोहळ्यात पाच वनस्पती आवश्यक असतात, त्यामध्ये आंबा, शमी, वड, बांबू इत्यादीचा समावेश होतो. लग्नविधीमध्ये अप्रत्यक्षपणे एक झाडाचे रोप लावण्याची प्रथा आहे. ही जमात निसर्गाला किती जपायची, हे या सर्व

प्रथा-परंपरांवरून लक्षात येते. या जमातीमध्ये नवरदेवाची वरात दोन दिवस निघायची, त्याला ‘बिनोरा’ असे म्हणत. वरातीमध्ये बँडचा उपयोग होत नव्हता, तर विविध प्रथा, परंपरा, धार्मिक ज्ञान या आधारित प्रश्नोत्तरी (बिऱ्या) होत असे. यावरून ही जमात आपले मूल्य व धार्मिक ज्ञान जपण्यासाठी किती धडपड करायची हे दिसते. लग्नसोहळ्यात नवरदेव आणि नवरी बाशिंग न वापरता त्यासाठी टोप (मोऱ्या) बनविण्याची पद्धत होती. टोपीमध्ये कवड्यांचा व मोरपिसांचा उपयोग होत होता. पारंपरिक गीत व नृत्याच्या आधारे हा लग्नसोहळा आनंदात साजरा होत होता.

केवट तागवाले या समाजाचा परंपरागत व्यवसाय आता कालबाह्य झाला आहे. तरुण पिढी नवीन व्यवसायाच्या शोधात आहे. किशोरवयीन मुले-मुली शिक्षणाची कास धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने भटके विमुक्त ‘ब’ वर्गात केवट तागवले या जमातीचा समावेश केल्यामुळे आता या समाजाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबद्दल केवट तागवाले समाजाने व केवट समाज महासंघाने आभार व्यक्त केले आहे. या निमित्ताने हा समाज प्रकाशझोतात यावा, यासाठी हा लेखप्रपंच

सुंदर लेख समरसता (साहित्य पत्रिका) वर्ष 5 अंक 3 सप्टेंबर 2024 छ पुस्तकामध्ये कोण आहे हे केवट – तागवले ? आशा प्रकारचा सुंदर लेखा द्वारे केवट समाजाची मांडणी पुस्तकात केली.

राहूल चव्हाण :-८१४९२०१२१४

प्रांत प्रमुख :- भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र