लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात; अनेक महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रूपये झाले जमा.

Share news

प्रतिनिधी सिताराम कळंबे

मुंबई – राज्य सरकारची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे. राज्य सरकारतर्फे 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आजपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजप आमदार राम सातपुते यांनी महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होण्यास सुरूवात झाल्याचे ट्विट करत महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या आपल्या भाषणातून या योजनेबाबत जनजागृती करत असून विरोधकांच्या टीकेलाही उत्तर देत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. या योजनेचा पहिला हफ्ता मुंबईतील महिलेला मिळाला आहे. मुंबईतील वरळी येथील महिलेच्या बँक अकाउंटमध्ये पहिल्या हफ्ता जमा झाला आहे.

विशेष म्हणजे 9 ऑगस्टला या महिलेच्या बँक खात्यात 1 रुपया चाचपणीसाठी जमा झाले होते. यानंतर आज 14 ऑगस्टला 3 हजार रुपयांचा पहिला हफ्ता जमा झाला आहे. वर्धा, लातूर, जालना, धाराशिवमध्येही महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज भरले होते त्यांना दोन महिन्यांचे 3 हजार रुपये देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे सिंधुदुर्गातही अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्गातही लाडक्या बहीण योजनेचा पहिला हफ्ता अनेक बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकदम दोन हफ्त्याचे तीन हजार खात्यात जमा झाले आहेत. योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाल्यानंतर कणकवलीत फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला आहे. राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

येत्या 17 ऑगस्टला 1 कोटी 2 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. याआधी काही महिलांच्या बँक खात्यात ट्रायल म्हणून 1 रुपये जमा करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे जमा केले जात आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.