छत्रपती संभाजीनगर विभागीय प्रतिनिधी राजेंद्र प्रधान
नांदेड जिल्हा रुग्णालयात तसेच छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथल्या सरकारी रुग्णालयांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या रुग्णांच्या आणि नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. इतकेच नाही तर या या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही संजय शिरसाट यांनी सांगितले आहे. नांदेडच्या घटनेवरुन राजकारण करु नका, कारण हा हीन प्रकार असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. सर्वसामान्य रुग्णालयात गरिबांची मुले जातात. या ठिकाणी व्यवस्थित औषधोपचार केले जात नाहीत, कारण काही दलाल तिथे बसलेले असल्याचे आमदार संजय सिरसाट यांनी म्हटले आहे. विरोधक सरकारवर आरोप करतात आणि नंतर सरकार सारवासारव करतात, आता हे बंद झाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी या प्रकरणांची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संजय सिरसाट यांनी केली आहे.
औषाधी मिळत नसल्याचे कारण रॅकेट
सरकारी रुग्णालयात रुग्णांना औषधी मिळत नाही. कारण औषध निर्माता कंपनी हाफकीन औषधांचा पुरवठा करत नाही. काही जुने औषध पुरवठादार होते. तात्र, ते केवळ सरकारी अनुदानाची बिले काढण्यात वेळ घालवत होते, असा आरोप संजय सिरसाट यांनी केला आहे. सर्वसामान्य लोकांना सरकारी रुग्णालयात औषधी उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे त्या दवाखान्यांच्या आजुबाजूला असलेली औषधांची दुकाने जोरात चालत असल्याचा आरोपही संजय शिरसाट यांनी केला. यामध्ये सर्वसामान्यांची पिळवणूक होत असून यामागे मोठ रॅकेट असल्याचा आरोप संजय सिरसाट यांनी केला.