मायबाप रसिकांनो, लोककला जपा -मंगला बनसोडे ;  वाटेगावात राज्यातील पहिले लोकशाहीर कला संमेलन

Share news

इस्लामपूर / प्रतिनिधी

फोटो ओळी- वाटेगाव (ता.वाळवा) येथे राज्यातील पहिल्या शाहिरी,लोककला संमेलनाचे उदघाटन करताना जेष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे. समवेत सावित्री साठे,सचिन साठे,डॉ.भारत पाटणकर,रविंद्र काका बर्डे,अंकल सोनवणे,शितल साठे, सचिन माळी,महेंद्र रोकडे,जयंत निकम,योगेश साठे व मान्यवर.

सध्या रसिकांच्या मागणीवरून तमाशाचे स्वरूपच बदलले आहे. सवाल जवाब,छक्कड चालत नाही. आजच्या पोरांना मॉडेल लागते, तिला नाचायला आले नाही,तरी चालते. आपली तमाशा कला,लोककला,शाहिरी जिंवत ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील मायबाप रसिकांनी प्रोत्साहन द्यायला हवे,अशी भावना राष्ट्रपती पदक विजेत्या,जेष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी व्यक्त केली. या प्रसंगी त्यांनी पोटासाठी नाचते मी परवा कुणाची ही लावणी सादर करून अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या केल्या. यावेळी मुबई विद्यापीठा स लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नांव द्यावे,असा ठराव करण्यात आला.

वाटेगाव (ता.वाळवा)येथील क्रांतिवीर बर्डे गुरुजी स्मारकमध्ये राज्यातील पहिल्या शाहिरी लोककला संमेलनाच्या उदघाटन समारंभात त्या बोलत होत्या. अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई श्रीमती सावित्री साठे, नातू सचिन साठे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.भारत पाटणकर,माजी सभापती रविंद्रकाका बर्डे, प्रा.डॉ.बाबुराव गुरव,जेष्ठ शाहीर अंकल सोनवणे,शाहीर शितल साठे,महेंद्र रोकडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शाहीर शितल साठे यांनी ‘माझी मैना’ही अण्णा भाऊं ची छक्कड,तसेच ‘जागा हो,जागा शाहिरीच्या मिठाला,अण्णा भाऊंचे नांव द्याहो,मुंबई विद्यापीठाला’हे गीत सादर केले. प्रारंभी अण्णाभाऊ साठे शिल्प सृष्टी व अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकमध्ये त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच वीर फकिरा-राणोजी यांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले.

मंगला बनसोडे म्हणाल्या, कोरोनाच्या काळात तमाशा कलावंतांचे फार हाल झाले. मी माझ्या परीने मदत केली. मात्र कोणीही मदतीला आले नाही. कला रसिकांनी टी.व्ही. आणि सिनेमा बघताना आम्हालाही प्रोत्साहन द्यायला हवे.

डॉ.भारत पाटणकर म्हणाले,सध्या लोककला लुप्त होत आहेत. जात्यावरच्या ओव्या,मोटेवरची गाणी,हदग्या ची गाणी,झिम्मा-फुगडीची गाणी बंद झाली आहेत. आपणास त्यांचा शोध घेऊन ती पुन्हा आणावी लागतील. सध्या आपला माणूस टी.व्ही.,मोबाईलला चिटकवून ठेवला आहे. त्याने कोणताही विचार करू नये,अशी व्यवस्था केली आहे. आपणास लोककला ही आजच्या जीवनाची कला बनवावी लागेल. मंगलाताईंची ‘पोटासाठी नाचते मी’ही लावणी लोककलेच्या शोकांतिकेचे आर्त रूप आहे. आपण दरवर्षी अण्णा भाऊंच्या जन्मभूमीत जमणार आहोत. जशी विठठलाची पंढरी, तशी राज्यातील शाहीर,लोक कलावंतांची वाटेगाव ही पंढरी करण्याचा आपला प्रयत्न आहे.

प्रा.डॉ.बाबुराव गुरव म्हणाले,आज आपण क्रांतिकारी पाऊल टाकत आहोत. येत्या ५-१० वर्षात पुन्हा महाराष्ट्र उभा राहील. शाहिरांनी आपला डीएनए काय आहे? याचा शोध घ्यावा. शाहीर हा केवळ कलावंत नाही, तर तो पुरोगामी विचारांचा कार्यकर्ताही आहे. आपला अन्नदाता समाज आहे,शासन नाही. लोकशक्तीवर विश्वास ठेवा. पुन्हा एकदा एकीचे रूमणे हातात घेऊन नवे पर्व घडवूया.

सचिन साठे म्हणाले,या संमेलनातून राज्यास एक नवा संदेश दिला जाणार आहे. दुसरे संमेलन अधिक व्यापक आणि मोठे करू. अण्णा भाऊंनी आयुष्यभर पोटासाठी लाचार बनविणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केला आहे. सध्या लोक चळवळी मारल्या जात आहेत. आपणास शाहिरी आणि लोक कला टिकवावी लागेल. यावेळी महेंद्र रोकडे यांनी आता घरात बसून चालणार नाही,पुन्हा एकदा बिन्नीवर धाव घ्यावी लागेल,असे आवाहन केले.

स्वागताध्यक्ष,माजी सभापती रविंद्र काका बर्डे म्हणाले, सध्या मनु स्मृतीचे उदात्तीकरण केले जात असताना आपणास गप्प बसून चालणार नाही. आम्ही दरवर्षी हा लोक जागर वाटेगावमध्ये घेऊन अण्णा भाऊं ची जन्मभूमी साहित्याची पंढरी करू.

याप्रसंगी कॉ.धनाजी गुरव,प्रा.सचिन गरुड,प्रा.डॉ.शरद गायकवाड,विजय मांडके, शाहीर सचिन माळी,प्रा.गौतम काटकर,शाहीर सदाशिव निकम,शाहीर रमेश बल्लाळ, रणजित कांबळे,आनंदा थोरात,अनिकेत मोहिते,जनार्दन साठे यांच्यासह राज्यातील दिग्गज शाहीर, लोक कलावंत,कार्यकर्ते आणि अण्णाभाऊ प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते. कॉ.जयंत निकम यांनी सूत्र संचालन केले. योगेश साठे यांनी आभार मानले.