जव्हार प्रसिद्ध हनुमान पॉईंट येथे रुग्णालय होणार; पर्यटन स्थळ नष्ट होणार असल्याने गावकरी संतप्त…

Share news

जव्हार – सुनिल जाबर

शासनाने ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला असलेला जव्हार पर्यटन स्थळाच्या विकासासाठी शासनाने गेल्या काही वर्षात शेकडो कोटीचा निधी खर्च केला आहे. येथील पर्यटन विकास झाल्यास आदिवासी भागातील जनतेचे जीवनमान उंचावेल व हातांना रोजगार मिळेल अशी शासनाची धारणा होती.

जव्हार शहरात विविध पर्यटन स्थळे आहेत त्यामध्ये जव्हारचेच नव्हे पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं एक ठिकाण म्हणजे हनुमान पॉईंट, निसर्गाने मुक्तपणे उधळण केलेले ठिकाण  पर्यटकांना अक्षरशा मोहून टाकतं तसेच हनुमान पॉईंट ही जव्हारची ओळख आहे व शान आहे हे कोणी नाकारू शकत नाही. हनुमान पॉईंट इथे असणारं काट्या मारुतीरायाचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी शेकडो हजारो लाखो भाविकांची नाळ जोडलेली आहे.. हनुमान पॉईंट हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

आदिवासी दुर्गम जव्हार मोखाडा तालुक्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होऊन सुद्धा भक्कम आरोग्य व्यवस्था नाही. आदिवासी भागाला सक्षम आरोग्य यंत्रणा मिळण्यासाठी व आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून या भागात हजारो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. संविधानात प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळणे हा मूलभूत अधिकार मिळालेला आहे.

यासाठी येथिल नागरिक गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करीत आहोत. निश्चितपणे  जव्हार भागात सक्षम आरोग्य सेवा देणारे रुग्णालय असणे आवश्यक आहे आणि ती  गेल्या कित्येक वर्षापासून मागणी पण आहे.काही वर्षांपूर्वी राज्य शासनाने जव्हार तालुक्यात २०० रुग्णालयास मंजुरी दिली आहे. रुग्णालय मंजूर झाल्यानंतर  जव्हार गावावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना खूप समाधान लाभले होते. रुग्णालय मंजूर झाल्यानंतर प्रश्न आला तो म्हणजे ज्या ठिकाणी हे रुग्णालय बांधले जाणार ती जागा शोधणे. जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात शासनाच्या जमिनी आहेत.

असे असताना शासकीय काम सहा महिने थांब या युक्तीप्रमाणे गेल्या तीन ते चार वर्षांपासून हे रुग्णालय लाल फितीत अडकले होते.

खूप चर्चा बैठका झाल्यानंतर या रुग्णालयास भूखंड उपलब्ध होत नाही या भावनेतून  तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने व आरोग्य सेवा बळकट होणार या दृष्टिकोनातून श्री.राम मंदीर ट्रस्ट, जव्हार यांनी मौजे जुनी जव्हार येथे २५ एकर जमीन निशुल्क शासनास विनाअट दान करण्यास तयार असल्याचा ठराव एक वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनास दिला होता.शासनानेच जव्हार पर्यटन स्थळास ब वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आहे व जव्हार पर्यटन स्थळाचे मुख्य केंद्र असलेलं हनुमान पॉईंट येथील १३ एकर जागेत रुग्णालयाचे बांधकाम करण्याचा मानस राज्य सरकारचा असल्याचा समजल्यानंतर गावावर प्रेम करणाऱ्या काही जागृत लोकांनी एकत्र येऊन याबाबत सह्यांची मोहीम राबवून जिल्हा प्रशासनाला विनंती केली की आपण देवस्थान कमिटीने दिलेल्या १५ एकर जागेवर सदर रुग्णालय निर्माण करा व आमच्या जव्हारकरांचे भावनिक नाळ ज्या ठिकाणी जोडलेली आहे अशा हनुमान पॉईंटवर सदर रुग्णालयाचे बांधकाम करू नका. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही नागरिकांच्या सहयांचे पत्र काही दिवसांपूर्वी आपण दिले होते असे असताना सुद्धा गावकऱ्यांच्या मतांचा आदर न करता, भावना न समजून घेता दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा प्रशासनाने जव्हार नगर परिषदेच्या हद्दीतील हनुमान पॉईंट येथील भूखंड रुग्णालयाच्या बांधकामासाठी जिल्हा आरोग्य विभागाला हस्तांतर करण्याचे पत्र काढले आहे.

रुग्णालय होणे व येथील आरोग्य यंत्रणा सुधारणे हे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे येथील नागरिकांचे स्वप्न आहे मात्र प्रत्येक इमारतीसाठी एक ठराविक जागा असते. स्मशानभूमी ही गावाच्या बाहेर असते आणि जव्हार शहर हे निसर्गाने नटलेलं शहर आहे.

हनुमान पॉईंट इथे रुग्णालयाचे बांधकाम झाल्यास प्रसिद्ध असे हनुमान पॉईंटची मोठ्या प्रमाणात हानी होईल. आणि पर्यायाने जव्हारचं वैभव नष्टच होईल या दुमत नाही. हनुमान पॉईंटची दुर्दशा नक्कीच होणार त्याबरोबरच  हनुमान पॉईंट ज्यामुळे ओळखला जातो त्या काट्या मारुतीरायाचे मंदिराचे पावित्र्यही नष्ट होईल. आणि भाविकांच्या भावनांची खेळ होईल.

हनुमान पॉईंट येथे रुग्णालय होणार असल्याने गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असून जिल्हा प्रशासनाने तात्काळ आपला निर्णय  बदलावा अशी मागणी गावकऱ्यांना केली आहे.

जमीन पर्यटन विकास महामंडळाची.??

जिल्हा प्रशासनाने जागा जरी हस्तांतरित केली असली तरी सदर जागा ही पर्यटन विकास महामंडळाची असल्याची चर्चा सुरू असून भुखंड महामंडळाच्या नावावर असताना सुद्धा बेकायदेशीर रित्या जिल्हा प्रशासनाने हस्तांतर केल्याचे सांगितले जात आहे.

मौजे.जुनी जव्हार येथील श्रीराम संस्थेच्या मालकीची २५ एकर जागा आम्ही मोफत रुग्णालयासाठी दान करण्यास तयार आहोत याबाबत दोन वर्षांपूर्वीच जिल्हा कार्यालयात ठराव व पत्र दिले आहे.

– नंदकिशोर अहिरे 

सचिव,श्री.राम मंदिर ट्रस्ट,जव्हार

 

हनुमान पॉईंट हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून या ठिकाणी रुग्णालय झाल्यास पर्यटनाची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. जव्हारचे राजे महेंद्रसिंह मुकणे तसेच श्रीराम संस्था हे रुग्णालयासाठी मोफत भूखंड दान करण्यास तयार आहेत.

– दिलीप रामचंद्र तेंडुलकर 

माजी उपनगराध्यक्ष, जव्हार नगरपरिषद, जव्हार