चेंबूरमध्ये सिध्दार्थ काँलनीत भीषण आग; एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू..

Share news

प्रतिनिधी सिताराम कळंबे

 चेंबूर – मुंबईमधून अतिशय हृदयद्रावक अशी बातमी समोर आली आहे. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत भीषण आगीची घटना घडली आहे. आज रविवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास एका दुमजली घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील ७ जणांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनी आहे. या कॉलनीत दाटीवाटीनं घरं आहेत. मोठ्या प्रमाणात लोक इथं राहतात. सतत गजबजलेला हा भाग आहे. पहाटे साडेचार वाजता या कॉलनीतील एका घराला आग लागली. झोपेत असल्याने अनेकांना काय घडलं हे समजलंच नाही. ज्यावेळी समजलं त्यावेळी मात्र फार उशीर झाला होता. या कॉलनीत राहाणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचा यात होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. त्यात एक मुलगी ही सात वर्षाची आहे. तर एक मुलगा हा दहा वर्षाचा आहे. या दुर्घटनेत काहीजण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

पहाटेच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या, स्थानिक पोलीस पोहचले. सध्या ही आग विझवण्यात आलेली आहे. आगीतील जखमींना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना मृत घोषीत करण्यात आले. आज रविवार असल्याने गुप्ता कुटुंब हे रात्री जेवण करुन गाढ झोपले होते. पहाटे साखरझोपेत असताना अचानक घराला आग लागली. ही आग इतकी भयानक होती, की क्षणार्धात संपूर्ण घराला आगीचा विळखा पडला. त्यामुळे काही कळण्याच्या आतच क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. घटनेची माहिती मिळताच अग्नशमन दल घटनास्थळी पोहोचले होते.

 

त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र ऐन सणाच्या वेळी एकाच कुटुंबातील सात जणांना जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही आग नेमकी शॉर्टसर्कीटमुळे की आणखी कशामुळे लागली याचा तपास केला जात आहे. आग लागल्यानंतर या परिसरात एकच धावपळ उडाली होती.