महाड (चेतन पोवळे) : महाड MIDC मधील प्रसोल केमिकल्स कंपनीत विषारी वायूची गळती होऊन एका कामगारचा मृत्यू झाला असून चार कामगार बेशुद्ध पडले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला मुंबईत हलविण्यात आलं. उर्वरित तिघांवर महाड येथे उपचार सुरु आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, गुरुवारी दि.5 रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या कंपनीत हायड्रोजन सल्फाईड या वायूची गळती झाली. काम करत असलेल्या पाच जणांना वायूची बाधा झाल्याने ते बेशुध्द पडले. त्यांना तातडीने महाड येथील न्यू लाईफ रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात येत असतानाच अखिलचा मृत्यू झाला. संतोष मोरे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईत हलविण्यात आले आहे. नागेश चव्हाण, परमेश ठाकूर, इंद्रजीत पटेल यांच्यावर न्यू लाईफ रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.